अन्नपूर्णे- सदापूर्णे


अन्नपूर्णे- सदापूर्णे

अन्नपूर्णा देवीला, चैत्र तृतीया ते अक्षय्य तृतीया झोपाळ्यात बसवून पूजा केली जाते. रोज वेगवेगळी खिरापत नैवेद्याला केली जाते. हळदी कुंकू समारंभ, नित्य अन्नपूर्णा स्तोत्र पठण, वैगरे थोडक्यात उपासना करण्याची परंपरा काही ठिकाणी आपल्याकडे आहे. जे मलाही आवडत! सुरुवातीला मी देखील हे व्रत महिनाभर करायची. पण आम्ही अजाणतेपणी एकदा बाहेर फिरायला गेलो आणि आई म्हणाली पाहुण्यांना बोलावून बाहेर जातात का? तसंच आहे समज... माहेरवाशीण आहे ती, करायचं असेल तर व्यवस्थित कर. माझ्या सासरी-माहेरी ही प्रथा नाही.पण आजोळी आहे! 

माझी आई चैत्रगौरीचे हळदीकुंकू खूप छान करायची. खूप मौज वाटायची. सजवलेली चैत्रगौर, त्यापुढे आरास,  चैत्रांगण, चाफा-मोगऱ्याचा सुगंध, दारावर आंब्याची डहाळी-तोरणं, सडा-रांगोळी, चंदनाच्या वाटीत शिंपला, वाळा अत्तर, गुलाबपाणी, केशर वेलचीयुक्त पन्हं, आंब्याची डाळ, कलिंगडाच्या फोडी, काकडीचे काप, द्राक्षांचा गड, करंज्या, खिरापत, गोड सुपारी, हरभऱ्यानंची ओटी, भरजरी रेशमी साड्या आणि घर सुद्धा छान नटलेल, प्रसन्न वातावरण! खूप जणी येणार...मला खूप मज्जा वाटायची. नवीन ड्रेस मिळायचा, दिवाळीच असायची जणू… 

जे बघतो ते करतो. मग मी देखील चैत्रगौरीच हळदीकुंकू करायला लागले. माझ्या मते हे 'व्रत' एक महिना किंवा एक दिवसाचे नसून "आयुष्यभराचे" आहे म्हणजे बघा हं, माझ्या आईला मी कायमच मनापासून, पोटभर आग्रहाने सगळ्यांना खिलवताना बघितल आहे. लहान असताना घरी , बाबांचे मित्र कामाच्या निमित्ताने, माझा व बहिणीच्या  मैत्रिणी, नातेवाईक, शेजारी, कधी आगंतुक तर कधी ठरवून काही कार्यक्रम, काही ही असले तरी माझी आई सदैव सगळ्यांच्या सरबराईत असलेली आम्ही पाहिली आहे..अजूनही असते. तर अशी ही माझीआई आनंदी अन्नपूर्णा आहे. प्रत्येक  मुलीसाठी आपली आई -आज्जी अन्नपूर्णाच असतात म्हणा! 'अगत्य आणि आग्रह' याला कसली कसली नाही तर फक्त "मनाची श्रीमंती" लागते. वारसा मिळतो, पण तो पुढे चालू ठेवायला पाठींबा लागतो. कुठलाही कार्यक्रम हा एका दिवसाचा आणि एका माणसाचा नसतो. तर तो कुटुंबाचा आणि पाठच्या पुढच्या दिवसांचा असतो.  पुण्यात असताना घरी कामासाठी येणाऱ्या मावशी तितक्याच आनंदाने मदतीला तयार असायच्या आणि काहीही विसरले तर 'मै हू ना' म्हणून भाऊराया तयार असायचे. काही आणायच का बेटा, मी खाली उतरतोय म्हणून सासरेबुवा तयार असायचे. काकू म्हणजे सासुबाई होत्या तेव्हा शांतपणे पाठिंबा होता. मी अमुक एक करते, तू आवर तुझं... आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नवऱ्याचा पाठींबा असतोच हो ! आता लेक मोठा झालाय. फोटो काढलेस का? मी मदत करू का? म्हणून विचारतो आणि उत्साह-आनंद किलो किलो ने वाढतो 😁. 

आपल्याला अनेक रुपात अन्नपूर्णा दिसते म्हणजे बघा हं, pandemic मध्ये अनेकांनी अनेकजणांना घरपोच डबे दिले. इथे ओळख-पाळख, जात-पात, गरीब-श्रीमंत काहीही आड आल नाही. त्याकाळात, आमच्या सोसायटीत सिक्युरिटीज् ना चहा-बिस्किट, आम्ही काहीजणींनी नंबर लावून स्वेच्छेने दिले. सुरुवातीला गरजूंना डब्बे दिले. प्रत्येकीला ठरलेला पोळ्यांचा आकडा होता आणि एका ठिकाणी भाजी तयार करायची. हे काही महिने चालू होत. अशाप्रकारे अनेक ठिकाणी आपल्याला कितीतरी रूपात अन्नपूर्णा दिसतात. हो ना!!

किती करतेस ग देव देव... असे ऐकल्यावर मात्र सांगावं लागत. नाही हो ! फक्त हळदीकुंकू करून कोणी देव- देव करत असं होत नाही. हा खूप मोठा विषय आहे, आध्यात्म आणि देव-देव. तरीपण "चैत्रगौरीचं हळदीकुंकू"  हेच निमित्त आहे लिखाणाच. 

काही गोष्टी 'आनंद' देतात जो आपल्यालाही मिळतो आणि आपण दुसऱ्यानाही देतो. ह्यात कुठेही बंधन किंवा पुढच्या पिढीने हे करावं हा आग्रह नाही. कारण निर्मळ आणि निव्वळ आनंद आहे जो, तो स्वतः मिळवावा लागतो.  

अमेरिकेतही, छान हळदीकुंकू झालं. इच्छा तिथे मार्ग त्यामुळे सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव उत्तम झाली. इथेही प्रत्येकीने विचारल मदतीला येऊ का ? काही आणू का.. नको तुम्ही या फक्त म्हणाले आणि one man show असतो इकडे म्हणुन मदतीला आलीच एक मैत्रीण. ह्या वर्षी हळदीकुंकवाचा बेत ह्यात, कैरीची डाळ आणि पन्हं कलिंगड, काकडीचे काप होतच. पण जोडीला पुरण-हायग्रीव्, वडा-चटणी असा आगळा बेत होता. एक मैत्रीण वगळता बाकी सगळ्या अमराठी मैत्रिणी होत्या. वडा-चटणी, वडापाव हा आता जगत् माननीय आणि प्रिय पदार्थ आहे. पन्ह भारतातल्या सगळ्या प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने केल जात. मग नवीन काय तर आपली आंब्याचीडाळ आणि हायग्रीव् . everything is super tasty but want to know more about खट्टी-चटपटी दाल अँड स्वीट दाल! मैत्रिणीनी आवर्जून दोन्हीची रेसिपी विचारली आणि खूष झाल्या. एक चणाडाळ भिजवून त्यातून दोन रेसिपीज मिळतात. कर्नाटकी पारंपरिक पदार्थ 'हायग्रीव' आणि मराठी ब्राह्मणी पारंपारिक पदार्थ 'कैरीची डाळ किंवा आंबेडाळ' आणि मला सांगितलं की 'आपके जेठानी को और मम्मी जी को जरूर बताईये हमे दोनों रेसिपीज बहुत अच्छी लगी और हम जरूर बनाके खिलायेंगे'.  आंब्याची डाळ आईकडुन आणि हायग्रीव् हा पदार्थ वहिनींन (जावे) कडुन शिकले.

निमित्त हळदीकुंकू आणि दोन प्रांतातील पारंपारिक पदार्थ  वेगवेगळ्या प्रांतात पोहोचले.. अजुन एक, मराठी लोगोमें गणेशजीका पुजन, संक्राती का हलदीकुंकू होता है पताथा. लेकिन ये हल्दीकुंकू totally new for us इति सख्या. कारण नवरात्र,  दिवाळी, होळी हे भारत भर होत. कितना कुछ होता है! मराठी लोगोंमें आणि विषय...वाढता वाढता वाढे... मग काय, यादोंकी बारात निकली...! 😁

जाता जाता, एक हायग्रिवची पाककृती थोडक्यात, जस मला जमलं तसं… नेहमी करतो तसच पुरण चणाडाळीच! फक्त थोड सैलसर डावेने घोटलेल आणि गुळाच.  त्यावर खमंग भाजून खोबऱ्याचे काप, खसखस, तळून मनुका व काज-बदाम, जायफळ- वेलचीची पूड, आवडतं असल्यास चारोळी वर तुपाची धार.. झालं! (बरं, भाजुन, तळून जे घातलय ते सढळ हाती). 


"आधुनिकता" जरूर असावी, 'विचारात' तर आवर्जुन यावी. देश-काळ परतवे ती जोपासावी. पण आपल्या गोष्टी नाकारून नव्हे, तर स्विकारून. अशीही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी लिहून पूर्ण... समारंभ रूपी चालूच राहिल! 😊

सासरी -माहेरी, आजोळी-पंजोळी, मैत्रिणी-शेजारणी, सगळ्यांच्या हातच चाखल-खाल्लं, पदार्थ शिकले पुढे शिकत राहीन.  यानिमित्ताने सगळ्या अन्नपूर्णानां माझा नमस्कार🙏🏻 असाच लोभ असावा.😊


अन्नपूर्णे, सदा सर्वदा योग तुझा घडावा. 


श्रावणी बिनीवाले

Cupertino,CA

 


Comments

Popular Posts